जिथे संकट, तिथे कविता जिवंत आहे

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-column-by-dr-5346804-NOR.html

 

जिथे संकट, तिथे कविता जिवंत आहे
रती सक्सेना या हिंदीतील जेष्ठ कवयित्री म्हणून सुपरिचित आहेत. मूळच्या राजस्थानच्या असलेल्या रतीजी मागील तीन दशकांपेक्षा अधिक काळ केरळमध्ये वास्तव्यास आहेत. संस्कृत, राजस्थानी, हिंदी, मल्याळी, इंग्रजी आदी भाषांच्या त्या जाणकार आहेत. ‘अथर्ववेद’ हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. अयप्पा पणीक्कर यांच्या कवितांचे रतीजींनी हिंदीमध्ये भाषांतर केले आहे. या भाषांतरासाठी त्यांना साहित्य अकादमीच्या अनुवाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कविता वाचनाच्या निमित्ताने रतीजी सतत देश-विदेशात भ्रमंती करत असतात. ‘रसिक’च्या ‘कवितांजली’ सदरामध्ये त्यांच्या कवितांचे मराठी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्ताने डॉ. पृथ्वीराज तौर यांनी रतीजींशी साधलेला हा संवाद…
पृथ्वीराज तौर : वर्तमानात कवितेचं अस्तित्व काय आहे?
रती सक्सेना : आपण हे सदैव स्मरणात ठेवायला हवं की, कवितेचं अस्तित्व कधी संपत नाही. आपल्याला असं वाटतं, की कविता संपत आहे; पण कविता कधीच मरत नाही. कविता हा असा मानसिक विकास आहे, अशी मानसिक स्थिती आहे, जी नैसर्गिकपणे मानवात आलेली आहे. म्हणूनच असं लक्षात येईल की, अगदी प्राचीन काळापासून जगभर मौखिक आणि लिखित स्वरूपातील ग्रंथामध्ये केवळ कविताच आहे. आपल्याकडे तर अगदी गणितसुद्धा कवितेतून सांगितलं गेलं, ‘लीलावती’मध्ये कविताच आहेत. ज्योतिष, खगोलशास्त्र एवढंच काय, आपल्या कथाकहाण्याही कवितेतूनच सांगितल्या गेल्या आहेत. याचा अर्थ इतकाच की, कवितेचं अस्तित्व संपत नाही. वर्तमानात कविता आणि संकट यांचं नातं सांगता येऊ शकेल. हे संकट भांडवली व्यवस्थेनं निर्माण केलेलं आहे. वर्तमानात जिथे संकट आहे, तिथे कविता जिवंत आहे. तुम्ही जगभर बघा, तुम्हाला हेच दिसेल. उदाहरणार्थ आज सिरियात कविता आहे, पॅलेस्टाइनमध्ये कविता आहे. इस्राएलमध्येही थोडीफार कविता आहे, अमेरिकेत सरकारी पातळीवर नसली तरी विरोध, विप्लव, प्रतिरोधाचा स्वर म्हणून कविता आहे. युरोपात ती आहे आणि नेदरलँड, स्टोनिया, स्लोव्हाकिया(लितावा) अशा छोट्या राष्ट्रांमध्ये खूप चांगली कविता तुम्हाला सापडेल. चीन, इराण आणि तुर्कीत तुम्हाला चांगली कविता मिळेल. म्हणजे, कवितेचं अस्तित्व सर्वत्र आहेच. इराण आणि तुर्कीमध्ये पंचतारांकित हॉटेलचं नाव ‘शायरी’ असं आहे. अशा ठिकाणचं सौंदर्य, सजावट ही कवितांनीच केलेली मी पाहिली आहे. भारतातही तुम्हाला खूप सशक्त कविता आढळेल. हे खरं की, आज आमच्याकडे असे फारसे चेहरे उरले नाहीत, जे कवितेला दिशा देऊ शकतील, आणि हीही एक चांगली परिस्थिती आहे, असं म्हणता येईल. कारण यामुळे कुणाच्या पाठीमागे धावण्यापेक्षा स्वतःची दिशा निश्चित करण्यासाठी मोठा वाव आहे.
पृथ्वीराज तौर : आपल्या नजरेत भारतीय कवितेचं परिदृश्य काय आहे?
रती सक्सेना : भारतीय कवितेचं सद्यकालीन दृश्य फार चांगलं आहे, असं नाही. त्याच वेळी ते फार वाईट आहे, असंही म्हणता येणार नाही. चांगली गोष्ट अशी की, आजही कविता लिहिली जात आहे. चांगली गोष्ट अशीही आहे की, नवी पिढी सतत पुढे येत आहे. कवितेसाठी सगळं काही सोडून देणारे युवा कवी आज प्रत्येक भाषेत सापडतील. कविताच त्यांचं सर्वस्व आहे. तर दुसरीकडे एक स्थिती अशी आहे की, जिथे कवितेतून भाषा अनुपस्थित होत आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे आपण कोणत्या भाषेत लिहावं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण इंग्रजीत लिहू लागलो तर आपोआप वैश्विक होऊन जाऊ, असे गैरसमज अनेक कवी बाळगून आहेत. अशा वेळी कविता वर्तमानपत्रीय बातम्या तरी बनत आहे, किंवा नारेबाजी तरी करत आहे, तर कुठे ती कामशास्त्र किंवा कोकशास्त्राचा आश्रय घेऊन तगू पाहात आहे. माणसाची समज बदलली की, त्यासोबत ही स्थितीही बदलत जाईल, असे वाटते. लोकांना हे अजूनही कळत नाहीय की, इंग्रजी ही कवितेसाठी वैश्विक भाषा नाही. कविता देशी भाषेतूनच वैश्विक होत असते.
पृथ्वीराज तौर : कवितेच्या भाषांतराची आवश्यकता किती आहे?
रती सक्सेना : कवितेचं भाषांतर खूप महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं की, भाषांतरात कविता आपला मूळ चेहरा हरवून बसते. असं असलं, तरी कवितेचं वैचारिक रूप भाषांतरातून आविष्कृत होतच असतं. कवितेचे वैचारिक अंग महत्त्वाचे आहे. आज कविता केवळ मनोरंजनाचं नव्हे तर विचाराचं माध्यम आहे. तत्त्वज्ञानाचा आधार आहे. हे तत्त्वज्ञान भाषांतरानंतरही भेटू शकतं, म्हणून कवितेचं भाषांतर गरजेचं आहे.
पृथ्वीराज तौर : आपण दशकापासून ‘कृत्या’ या कवितेच्या नियतकालिकाशी आणि कविता महोत्सवाशी जोडलेल्या आहात. ‘कृत्या’च्या निर्मितीमागील प्रेरणा आणि कारणे कोणती आहेत?
रती सक्सेना : कृत्या पत्रिका आणि महोत्सव एकाच काळात सुरू झाले. कविता संपत जातेय, अशी चर्चा त्या काळी मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. नियतकालिकांमध्ये कविता प्रकाशित होणं जवळजवळ थांबलं होतं, वर्तमानपत्रांकडे कवितेसाठी जागा उरली नव्हती. आमच्या काळातील श्रेष्ठ कवी एकेक करून निघून जात होते. विशेषतः केरळमध्ये मी पाहात होते की, एक पोकळी निर्माण होत होती. अयप्पा पणीक्कर, विनय चंद्रन, ओएनव्ही कुरुप, सुगत कुमारी ही जी मोठी मोठी नावं होती, ती थकली होती, वृद्धत्वाकडे झुकली होती, त्यांचं लेखनही कमी कमी होत गेलं होतं. यामुळे एक दरी निर्माण झाली होती, पोकळी जाणवू लागली होती. अशा वेळी लोकांना भीती वाटू लागते. मग ते म्हणू लागतात, की कविता निघून गेली आहे. तर अशी स्थिती आली होती आणि मलाही वाटू लागलं होतं, की दूर दक्षिणेकडे एखादी पत्रिका, एखादं कवितेचं नियतकालिक असणं आवश्यक आहे. उत्तरेतील नियतकालिके हिंदी पट्ट्यातच मग्न होती, त्यांना बाहेर कोण लिहीत आहे, याच्याशी घेणं देणं नव्हतं. मी केरळमधून एखादी कविता पाठवली की त्यांचा असा समज होई की, कुणी मल्याळी आहे, जी सक्सेना हे टोपण नाव घेऊन लिहीत आहे. या मानसिकतेला उत्तर देणं गरजेचं होतं, म्हणून मग आम्ही आमचं नियतकालिक सुरू केलं. छपाईची साधनं आमच्याजवळ नव्हती, म्हणून मग आम्ही स्वतंत्र वेबसाईट तयार केली. अर्थात, त्या वेळी नेट खूप महाग होतं, तरी आम्ही जिद्द सोडली नाही. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ठिकाणच्या वाचकांची सोय व्हावी, म्हणून आम्ही आमच्या नियतकालिकाचं स्वरूप द्वैभाषिक ठेवलं. पत्रिका सुंदर असावी, त्यातून विशिष्ट अनुभूती मिळावी, आणि फक्त कवितांसाठीच असावी, असं आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं. ही दोन भाषांची पत्रिका नाही, तर दोन भाषांच्या भाषांतरांची पत्रिका आहे. तेलुगू, कश्मिरी, डोगरी, पूर्वोत्तर राज्यातील विविध भाषांमधील कविता आम्ही सुरुवातीपासून प्रकाशित केल्या आहेत. याशिवाय इटालियन, पोलिश कवितांचे विशेषांक आम्ही प्रकाशित केले. अयप्पा पणीक्कर सुरुवातीपासून आमच्या पाठीशी होते. कवितोत्सवाची कल्पना त्यांचीच आहे. त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली. त्यांनी सांगितलं की, कविता घेऊन लोकांकडे जा, लोकांना बोलावू नका. या रस्त्याने आम्ही पुढे वाटचाल सुरू केली. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी आयोजनाच्या अडचणी आल्या; पण जम्मू कश्मीर, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र अशा विविध राज्यांत आम्ही हा महोत्सव आयोजित केला. अनेक विदेशी कवी वेळोवेळी या महोत्सवात सहभागी झाले. कृत्याच्या प्रसिद्धीमुळे २०११ला मला मेंडलिनला बोलावलं गेलं, त्या ठिकाणी ‘वर्ल्ड पोएट्री मूव्हमेंट’ची स्थापना करण्यात आली. या चळवळीची मला संस्थापक सदस्य करून घेण्यात आलं.
पृथ्वीराज तौर : साहित्य महोत्सव किंवा कविता महोत्सवाची आज जगभरची स्थिती काय आहे?
रती सक्सेना : जगामध्ये आज दोन प्रकारचे साहित्य उत्सव साजरे केले जातात. पहिला प्रकार म्हणजे कविता महोत्सव, ज्याला आपण ‘पोएट्री फेस्टिवल’ म्हणतो. जगभर अशा उत्सवांचं प्रमाण मोठं आहे. दुसरा प्रकार ‘बुक फेअर’ हा आहे. इंग्लंड हा देश बुक फेअरचा प्रणेता आहे. आपल्याकडे इंग्लंड-अमेरिकेचं खूप आकर्षण आहे, त्यामुळे आपण जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि इतर ठिकाणी बुक फेअर आयोजित करत असतो. बुक फेअरमध्ये प्रकाशन संस्थांचा आयोजनात पुढाकार असतो, त्या ठिकाणी प्रकाशक आपापल्या लेखकांना घेऊन येत असतात, तुम्हाला पैसे मोजून त्यांना भेटता-बोलता-ऐकता येतं. बुक फेअरमध्ये प्रकाशक लेखकांच्या सोबतीला चित्रपट अभिनेते, खेळाडू, पत्रकार असे सगळे व्यासपीठावर येऊन चर्चेत भाग घेत असतात.
पोएट्री फेस्टिवल हे दक्षिण अमेरिकेत विशेष लोकप्रिय आहेत. अर्जेंटिना, मेंडलिन, कोलंबिया, क्युबा अशा देशांत कविता उत्सव सतत आयोजित केले जात असतात. अशा उत्सवात सगळेच लोक सहभागी होत असतात. शाळेतील विद्यार्थी, रस्त्यावरची माणसे हे सगळेच तुमचे दर्शक, श्रोते असतात. समस्यांशी सतत दोन हात करणाऱ्या तिसऱ्या जगात कविता उत्सव लोकांना आपले वाटतात, असे सद्यकालीन चित्र आहे.
चीनमध्ये साहित्य उत्सवांचे आयोजन मोठ्या मोठ्या संस्थांकडून, उद्योगांकडून होत असते. कविता हा तत्त्वज्ञानाचा मार्ग आहे, अशी त्या लोकांची धारणा आहे. धर्म आणि धर्मस्थळांवरती होणारा खर्च चीनमध्ये साहित्य आणि संस्कृती महोत्सवावरती केला जातो. इराण आणि तुर्कस्थानसारख्या देशांना शायरीचा संपन्न वारसा लाभलेला आहे, तो त्यांच्या बहुतेक गोष्टींतून व्यक्त होताना दिसेल.
अमेरिकेत मात्र सरकारी पातळीवर साहित्य महोत्सवांना विशेष प्रोत्साहन दिले जात नाही. तेथील विद्यापीठे साहित्यासाठी करत असलेले काम मात्र इतरांच्या तुलनेत भरीव आहे. न्यूयॉर्कमध्ये ‘पोएट्री स्ट्रीट’ नावाचा रस्ता आहे, त्या भागात स्लोगन पोएट्री, रिॲक्शन पोएट्री, स्ट्रिट पोएट्री, सरकारविरोधी कविता अशांसाठी चांगलं वातावरण आहे, समविचारी कवी एकत्र येऊन तिथे आपले कार्यक्रम करत असतात. नेटिव्ह अमेरिकन पोएट्री अशी चळवळ सध्या तिकडे चर्चेत आहे.
युरोपात बहुतेक सगळ्या देशांमध्ये साहित्य महोत्सवांना पोषक वातावरण आहे. स्थानिक नगरपालिका अशा कार्यक्रमांच्या देखण्या आयोजनात पुढाकार घेत आहेत, असे चित्र तुम्हाला स्पेन, पोर्तुगाल अशा देशांमध्ये पाहायला मिळेल.
पृथ्वीराज तौर : आपण बहुभाषी आहात. भाषेला आपण कशा सामोरे जाता? भाषा आपल्यासाठी साधन आहे की साध्य?
रती सक्सेना : मी स्वतःला बहुभाषी समजत नाही. मी बाहेर जाते, त्या वेळी मला नेहमी वाटतं की, मला फ्रेंच आणि स्पॅनिश या भाषा यायला हव्या होत्या. कवितेच्या क्षेत्रासाठी या दोन्ही भाषा खूप महत्त्वपूर्ण आहेत. या भाषा आल्या तर जगातील बहुसंख्य देशांमध्ये तुमचं काम सहज चालून जातं. हे खरं की, एकेकाळी संस्कृत माझ्या जीवनाशी अगदी लगटून बसलेली भाषा होती. मी संस्कृतमध्ये वादविवाद केले, संस्कृत रंगभूमीसाठी काम केलं, मला पानंच्या पानं तोंडपाठ होती, पण हा उपयोग दीर्घकाळ राहिला नाही. वर्तमानात एखादा श्लोक म्हणताना मी अडखळते. राजस्थानीसोबतही काहीसं असंच झालं. मल्याळी मला येते, कारण ती माझ्या दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे. इंग्रजीही जमून जाते. घरी हिंदी बोलली जाई, त्यामुळे ती येतेच. मी आता विचार करते, तर मला वाटतं की, माझ्याजवळ एकही भाषा नाहीय. माझ्याजवळ कविता आहे, पण भाषा नाहीय. पण शेवटी कवितेची म्हणून स्वतःची एक भाषा असतेच. शब्दांची भाषा ही बऱ्याच वेळा कवितेसाठी अपुरी पडते. ती कवितेसाठी साधन आहे, कारण कविता शब्दांच्या पलीकडे जात असते.
पृथ्वीराज तौर : भाषांतराचं महत्त्व तुम्ही कसं अधोरेखित कराल?
रती सक्सेना : भाषांतर हे एक आव्हान असतं. मी वर्गामध्ये भाषांतर प्रक्रिया शिकलेली नाही. मी आजही कवितेचा जेव्हा अनुवाद करते, तेव्हा तीन-चार ड्राफ्ट करावे लागतात. पहिल्या सुरुवातीच्या खर्ड्यात कवितेच्या शब्दांना आपण उघडत जातो. वेगळं वेगळं करत जातो. शब्दांची डिकोडिंग करण्याची ही प्रक्रिया असते. अयप्पा पणिक्कर, बालामणीअम्मा यांच्या कवितांचे अनुवाद करताना मला शब्दांशी पुन:पुन्हा झुंज द्यावी लागली. नंतरच्या ड्राफ्टमध्ये रचनेतील कवितापणाची पुनःस्थापना करावी लागते. त्यामुळे मी पुन्हा सांगेन की, भाषांतराचं आपलं स्वतःचं महत्त्व आहे, आणि इतरांना समजून घेणे त्याच्याशिवाय शक्य नाही.
डॉ. पृथ्वीराज तौर (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
drprithvirajtaur@gmail.com
पृथ्वीराज तौर संपर्क : ७५८८४१२१५३
रती सक्सेना संपर्क : ९४९७०१११०५